अभिनेता अमोल पालेकरांना 25 वर्षांनंतर रंगमंचावर पाहण्याची संधी : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून रुपरेषा जाहीर
वार्ताहर / कणकवली:
येथील वसंतराव सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित मच्छींद्र कांबळी स्मृती नाटय़ोत्सवाची रुपरेषा जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार 6 ते 12 फेब्रुवारी या कालाधीत हा महोत्सव चालणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर दिग्दर्शक व अभिनेता अमोल पालेकर यांना रंगमंचावर पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. नाटय़ोत्सवाचे हे 28 वे वर्ष असून आतापर्यंत 160 हून अधिक दर्जेदार नाटके रसिकांना पाहता आली आहेत. सहभागी व्हावे, असे आवाहन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पंडित व पदाधिकाऱयांनी केले आहे.
येथील प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पंडित बोलत होते. ऍड. एन. आर. देसाई, कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह राजेश राजाध्यक्ष, खजिनदार धनराज दळवी, लीना काळसेकर, मिलिंद बेळेकर उपस्थित होते.
पंडित म्हणाले, या उपक्रमाच्या 28 व्या वर्षाच्या निमित्ताने मालवणीची सांस्कृतिक पताका साता समुद्रापार नेणारे ज्येष्ठ अभिनेते मच्छींद्र कांबळी यांचे नाव महोत्सवाला द्यायचे निश्चित केले आहे. यावर्षीपासून हा महोत्सव मच्छींद्र कांबळी स्मृती नाटय़ोत्सव, कणकवली या नावाने आयोजित करण्यात येत आहे.
दिग्गज रंगकर्मींची हजेरी!
आतापर्यंत 27 वर्षांत या नाटय़ोत्सवात प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मराठीतील दिग्गज रंगकर्मींनी हजेरी लावली. नसिरुद्दीन शाहसारख्या जागतिक किर्तीच्या कलावंतांनी या ठिकाणी नाटय़प्रयोग सादर केले. हबीब तन्वीर, अमोल पालेकर आदींनी या रंगभूमीवर कला सादर केली. ‘पगला घोडा, महानिर्वाण, घाशीराम कोतवाल, आईन्स्टाईन, कोपनहेगन’ ही इतिहासात अजरामर झालेली नाटके येथे सादर झाली.
कै. अरुण काकडेंना महोत्सव समर्पित!
जागतिक रंगभूमीशी नाते जोडत आधुनिक भारतीय रंगभूमीचा विकास अधोरेखित करणारे प्रयोग होते. या वाटचालीत फोर्ड फाऊंडेशन, थिएटर ऍकॅडमी, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, रतन टाटा ट्रस्टचे यांचे सहकार्य मिळाले. मच्छींद्र कांबळींनी संस्थेच्या कार्याचे नेहमीच कौतूक केले होते. नाटय़परिषदेचे अध्यक्ष असताना अ. भा. नाटय़संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी संस्थेवर दिली होती. संस्थेने वसंतराव आचरेकर यांचे नाव संस्थेला देत व नाथ पै यांचे नाव एकांकिका स्पर्धेला देत त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. पंडित जीतेंद्र अभिषेकी यांचे नाव संगीत महोत्सवाला देत त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण केली आहे. यावर्षीचा हा महोत्सव कै. अरुण काकडे यांना समर्पित करण्यात आला आहे.
अशी होणार नाटके सादर!
यावर्षीचा नाटय़ोत्सव अनेक अंगांनी वैशिष्टय़पूर्ण असणार आहे. गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी-कोकणचे सुपुत्र मामा वरेरकर यांनी लिहिलेले ‘भूमीकन्या सीता,’ 7 रोजी-भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित ‘गुमनाम है कोई,’ 8 रोजी-वसंतराव आचरेकर निर्मित ‘चाहुल,’ 9 रोजी-महाराष्ट्र फाऊंडेशन विजेते सोशल नेटवर्क निर्मित ‘हंडाभर चांदण्या’ नाटक होईल. 10 रोजी-ज्येष्ठ अभिनेता अमोल पालेकर यांचा अभिनय ‘कुसुर’ या एकपात्री नाटकातून अनुभवता येणार आहे. 11 रोजी- रामदास भटकळ लिखित ‘जगदंबा,’ व 12 रोजी-अभिनय कल्याण निर्मित आशुतोष दिवाण लिखित ‘घटोत्कच’ नाटक होणार आहे. ही सर्व नाटके वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे रोज रात्री 9.30 वा. सुरू होणार आहेत.