नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित : प्रशासनाचे दुर्लक्ष : तीन वर्षांपासून पाणीच नाही : नगरपंचायतीचा दर्जा मिळालाय पण विकास कधी?

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
मच्छे येथील संभाजीनगर चौथा क्रॉसमधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या नगरामध्ये पिण्याचे पाणी नाही, गटारींची साफसफाई करण्यात आलेली नाही, झाडेझुडूपे वाढलेली आहेत, पथदीप नाहीत अशा अनेक समस्यांच्या गर्तेत संभाजीनगर अडकलेले आहे. प्रशासनाचे या नगराकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
अलीकडेच मच्छे ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. मात्र, संभाजीनगरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून संभाजीनगरातील चौथ्या क्रॉसमध्ये पिण्याचे पाणीच नाही. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. आजूबाजूच्या कूपनलिका, शेतशिवारातील विहिरींचे पाणी आणावे लागत आहे. बहुतांश नागरिक टँकरने पाणी विकत घेऊनच आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. आम्ही दाद कुणाकडे मागायची? असा सवाल इथले सर्वसामान्य लोक करीत आहेत.
संभाजीनगरच्या प्रवेशद्वारावरच झाडेझुडूपे वाढलेली आहेत. सांडपाण्याने गटारी तुंबलेल्या आहेत. या गटारींमधून दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुंबल्या असल्याने या नगरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वयोवृद्ध व लहान बालकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रशासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, मच्छेतील या नगराची स्वच्छता का केली जात नाही, असे इथले नागरिक विचारत आहेत. गटारी तुंबलेल्या आहेत, गल्लीतील लोकांना एखाद्या मोठय़ा आजाराची लागण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
गटारी अर्धवट स्थितीत आहेत. गटारींच्या आजूबाजूने झाडेझुडूपे वाढलेली आहेत. या झाडाझुडूपांमुळे गल्लीतून लहान बालकांना फिरताना असुरक्षितता निर्माण झाली असल्याची माहिती पालकांनी दिली. चौथा क्रॉस येथे एका कूपनलिकेची खोदाई करण्यात आली होती व तिचे पाणी एका टाकीत सोडून पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या गल्लीचा पाणीपुरवठा बंद आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडून गेलेले आहे. अशा परिस्थितीत या गल्लीतील नागरिकांवर पाणी विकत घेऊन ते पिण्याची वेळ आली आहे.
मच्छे ग्राम पंचायतीमध्ये 47 सदस्य होते. तालुक्मयात ही सर्वात मोठी ग्राम पंचायत होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. ही गावच्या विकासासाठी आनंदाची गोष्ट आहे. निवडणूक झाली नसल्यामुळे सदस्य नाहीत. यामुळे नागरिकांना थेट पंचायतीत जाऊनच आपल्या तक्रारी मांडाव्या लागत आहेत. निवडणूक होईपर्यंत या पंचायतीतील अधिकाऱयांनी स्वतः समस्या असलेल्या परिसराची पाहणी करून त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आम्हाला सुविधा का नाहीत?

तीन वर्षांपासून गटारींची साफसफाई करण्यात आली नाही. गटारी तुंबलेल्या आहेत. पिण्याचे पाणी तर नळाला येतच नाही. दरवषी पाऊस आला की गटारीचे पाणी थेट घरात शिरते. आम्हाला या पावसाळय़ाच्या दिवसात हातात फावडा घेऊन गटारींची साफसफाई करावी लागते. ग्राम पंचायतीला याबाबत माहिती दिल्यास गटारीपासून घराची उंची वाढवून नव्याने घर बांधा, असे सांगण्यात येते. सर्वसामान्य लोकांना सध्याच्या परिस्थितीत नवीन घर बांधणे एवढे सोपे आहे का? आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला सुविधा का मिळत नाहीत?
-नीता संजय पाटील
सरकार पुढाकार का घेत नाही?

गल्लीत एक कूपनलिका होती, तीही बंद पडली आहे. त्यामुळे दररोज पाणी विकत घेऊनच प्यावे लागते. ही परिस्थिती आमच्यावर अजून किती दिवस राहणार आहे? पाऊस पडला की घरासमोर थांबून घरात शिरणारे पाणी काढावे लागते. आम्ही कुणाला विचारायचे? ग्राम पंचायतीकडे तक्रारी सांगायला गेल्यास कोणीही दाद देत नाहीत. सामान्य लोकांच्या भल्यासाठी सरकार पुढाकार का घेत नाही?
– यल्लुबाई राजाराम पाटील
गल्लीत वीजपुरवठाही नाही

पाण्याची तर रोज आवश्यकता असतेच. एकतर बाहेर कुठून तरी पाणी आणावे लागते. नाहीतर टँकरने पाणी विकत घेऊन जगावे लागत आहे. पाणी तर नाहीच शिवाय गल्लीत वीजपुरवठाही नाही. गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवीन खांब बसविण्यात आले आहेत. मात्र, खांबांवर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे आम्हाला अंधाराचाही सामना करावा लागत आहे.
– निर्मला बाबू लोहार
…अन्यथा पंचायतीवर मोर्चा

मच्छे ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला आहे. पंचायतीमधील वरिष्ट अधिकाऱयांना या भागातील समस्या सांगण्यासाठी गेलो असता नगरपंचायतीच्या प्रोसिजरचे कामच चालू आहे. त्यानंतरच तुमच्या समस्यांचा आम्ही विचार करू, असे आम्हाला सांगण्यात येते. या नगरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आम्ही पंचायतीवर मोर्चा काढू.
– सचिन बेळगावकर