प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जॉन्सन फर्नांडिस यांची वर्णी लावण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. जवळपास 5 महिन्यांपूर्वी आग्नेल फर्नांडिस यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतला होता. त्यांच्याकडे पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून ताबा होता, तर आता नियुक्त करण्यात आलेले जॉन्सन फर्नांडिस हे ‘सेटलमेंट अँड लँड रिकॉर्ड्स’ खात्याचे संचालक असून त्यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे खास अधिकारी (एसएलएओ) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आग्नेल फर्नांडिस यांनी आपल्या मुख्याधिकारीपदाच्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली होती. पालिका क्षेत्रातील कचरा समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. ज्ये÷ नागरिक तसेच दिव्यांगांची कामे तत्परतेने होतील याकडे त्यांचा कटाक्ष राहिला होता. दिव्यांगांकरिता पालिका इमारतीमध्ये खास सुविधा तयार करून घेण्यासाठी तसेच प्रभागवार सार्वजनिक प्रसाधनगृहात दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतले होते. त्यांची 5 महिन्यांत तडकाफडकी बदली झाल्याने यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची प्रतिक्रिया काही मावळत्या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
मडगाव पालिका ‘अ’ वर्गात येत असून येथे कामाचा व्याप मोठा असतो. त्यामुळे आग्नेल फर्नांडिस यांच्याप्रमाणे पूर्णवेळ मुख्याधिकारी असणे आवश्यक होते. आता जॉन्सन फर्नांडिस यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्यात आल्याने पालिकेतील आपल्या कामांना हे अधिकारी न्याय देऊ शकतील काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी अतिरिक्त ताबा असलेल्या मुख्याधिकाऱयांमुळे पालिकेची प्रशासकीय कामे खोळंबून सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसल्याचे दिसून आलेले आहे. सरकारने जॉन्सन फर्नांडिस यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्याऐवजी पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, सदर तडकाफडकी बदलीसंदर्भात आग्नेल फर्नांडिस यांच्याशी विचारणा केली असता आपणास बदलीचा आदेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपण सरकारी अधिकारी असल्याने सरकार नियुक्त करत असलेल्या ठिकाणी काम करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.