टॉवर्स मालमत्ता कराच्या कक्षेत : मुख्याधिकारी, पालिकेच्या संबंधित विभागांकडून मागविला तपशीलवार अहवाल
प्रतिनिधी /मडगाव
व्यावसायिक आस्थापनांच्या वाढत्या कर थकबाकीचा सामना करताना मडगाव नगरपालिकेने आता शहराच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात अनेक मोबाईल टॉवर्स कार्यरत आहेत जे पालिकेच्या मालमत्ता कराच्या कक्षेत येतात, असे स्पष्ट करताना मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी पालिकेच्या संबंधित विभागांकडून शहरातील मोबाईल टॉवर्सच्या स्थानांबाबत पालिकेच्या प्रभागांनुसार तपशीलवार अहवाल मागवला आहे.
पालिकेला व्यावसायिक आस्थापनांनी कर चुकता न केल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणात थकबाकी राहिली आहे, जी लवकरात लवकर वसूल करण्याची योजना पालिका तयार करत आहे, असे फर्नांडिस यांनी नजरेस आणून दिले आहे. मुख्याधिकाऱयांनी म्हटले आहे की, मडगावच्या व्यापारी समुदायासह कोणाविरुद्धही आमची पक्षपाती किंवा अन्य काहीही भूमिका नाही. विशेषतः कोविडनंतरच्या काळात चांगला व्यवसाय करण्यासाठी त्यांना आमचे सर्वतोपरी सहकार्य आहे. म्हणून, पालिकेला मदत करण्यासाठी, ज्यांच्याकडे कर थकबाकी आहे अशा सर्वांनी लवकरात लवकर पालिकेत कर भरावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
थकबाकी लवकर चुकती करा
पालिकेने नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन सिंगल केबिन झेनॉन वाहनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. करवसुलीच्या कठीण कामाचा सामना करत आणि मुख्यतः व्यावसायिक, कॉर्पोरेट्स आणि वित्तीय संस्थांच्या कर थकबाकीच्या डोंगरावर नजर ठेवून मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आपल्या संसाधनांचा वापर करून करवसुली अधिकारी आणि पथकाने वसुलीसाठी आवश्यक पावले उचलावीत तसेच सर्व आस्थापनांनी पुढे येऊन पालिकेला देय असलेला कर लवकरात लवकर भरावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.
ज्यांच्याकडे कराची मोठी थकबाकी आहे त्यांना सात दिवसांची मुदत देऊन झाली आहे. आम्ही कर्मचाऱयांसह कोणावरही भार टाकू इच्छित नाही, म्हणून पालिकेद्वारे ज्यांच्याकडे थकबाकी पडून आहे त्यांना पुरेसा वेळ दिला जातो. तो उलटून गेल्याने आता स्वेच्छेने पुढे येऊन कर भरावा, असे फर्नांडिस म्हणाले. कोविड-19 च्या संकटानंतर मडगावमध्ये व्यवसाय नेहमीप्रमाणे पूर्ववत झाला आहे. परंतु आता व्यावसायिकांची थकबाकी वाढत चालली असल्याने जे काही पालिकेला देणे आहे ते फेडणे शहाणपणाचे ठरेल, असे मुख्याधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी मडगावच्या व्यापारी समुदायाला शंभर टक्के सहकार्याची हमी दिली आहे.
नवीन वाहन थकबाकी वसुली पथकासाठी
मडगाव पालिकेला विविध व्यावसायिक व अन्य आस्थापनांकडून सुमारे 25 कोटी रुपये येणे बाकी असून सदर थकबाकीच्या वसुलीसाठी तैनात पथकासाठी शुक्रवारी उद्घाटन करण्यात आलेले जीप वाहन वापरात आणले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पेरेरा यांनी दिली. 14 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतील 9.38 लाख रु. खर्चून हे वाहन खरेदी करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.