बेळगाव / प्रतिनिधी
हिंडलगा क्रॉस ते गोजगा रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली असून मण्णूर ते गोजगा दरम्यान ओढय़ावर असलेल्या पुलाच्या कामाला युध्दपातळीवर सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्याची पावसाळय़ात दुर्दशा झाल्याने रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती. दरम्यान पुलाची उंची कमी असल्याने पावसाळय़ात पुलावर देखील दोन वेळा पाणी आले होते. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पुलाची उंची वाढवावी अशी मागणी प्रवाशांनी केली होती. आता प्रत्यक्ष रस्ता कामाबरोबर पुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे.
मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सध्या पुलावरील वाहतूक बंद ठेवून रस्त्याशेजारी माती टाकून वाहने जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्याची रूंदी वाढविण्यसाठी रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करण्यात आली असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाबरोबर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.