केवळ 4 मतदारयाद्या घेतल्याची माहिती उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका वॉर्डनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध करून दि. 1 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण मतदारयाद्या केवळ कानडी भाषेत असल्याने प्रत घेण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ 4 मतदारयाद्या नागरिकांनी महापालिकेकडून घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत धारवाड उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. याचिकेची सुनावणी 15 दिवस लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र अद्याप याबाबत सुनावणी झाली नाही. पण बेंगळूर उच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तयारी चालविली आहे. एप्रिल महिन्यात मतदारयाद्या तयार करून प्रसिद्ध करण्याची सूचना महापालिकेला केली होती. मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्याने मतदारयाद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. तरीदेखील तातडीने मतदारयाद्या तयार केल्या होत्या. पण राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेनुसार प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवून घेता आले नाहीत. त्यामुळे मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया रखडली होती.
मात्र अनलॉक होताच मतदारयाद्या तयार करून प्रसिद्ध करण्यासाठी घिसाडघाई करण्यात आली आहे. दि. 28 रोजी तात्कालिक मतदारयाद्या प्रसिद्ध करून दि. 1 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण मतदारयाद्या दि. 29 जूनपर्यंत तयार नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. मतदारयाद्यांचे पाच सेट तयार करून विविध कार्यालयात प्रसिद्ध केले आहेत. प्रसिद्ध केलेल्या मतदारयाद्यांवर महापालिकेचा शिक्का आवश्यक असल्याने शिक्का मारण्याचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. तसेच केवळ कानडी भाषेतून मतदारयाद्या प्रसिद्ध केल्याने प्रत घेण्याकडे इच्छुकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभरात केवळ चार नागरिकांनी मतदारयादीची प्रत घेतल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.
महापालिका व्याप्तीत 58 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डमध्ये 10 ते 15 हजार मतदार आहेत. काही वॉर्डमध्ये 6 ते 7 हजार मतदार आहेत. तसेच वॉर्ड पुनर्रचना झाल्याने कोणता भाग कोणत्या मतदारसंघात येतो, याची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे कोणती मतदारयादी घ्यायची हा प्रश्नदेखील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मतदारयादी घेण्यास पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद लाभला. मराठी भाषेतून मतदारयाद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरच मराठी भाषेत मतदारयाद्या उपलब्ध केल्या जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे.