प्रतिनिधी / कोल्हापूर
सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथील उदरनिर्वाह निगडीत असलेले व्यावसायिक शनिवारी (29 ऑगस्ट सकाळी 11 वाजता राज्यात सर्वत्र देवस्थाने, मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर ’घंटानाद आंदोलन’ करणार आहेत. ’दार उघड उद्धवा दार उघड’, ’दारू नको भक्तीचे दार उघड’, ’मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, ’भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’, असे या घंटानाद आंदोलनाचे स्वरूप असणार आहे.
दरम्यान, या आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला असून भाजपचे कार्यकर्ते कोरोनाचे नियम पाळत या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ङकोल्हापूर शहरामध्ये हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, यादव महाराज मठ इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घंटानाद करणार आहेत. शहरातील कसबा बावडा रेणुका मंदिर, वटेश्वर मंदिर एस.टी स्टँड, दत्त मंदिर कॉमर्स कॉलेज, राजारामपुरी 12 वी गल्ली मारुती मंदिर व टेंबलाई मंदिर, शेषनारायण मंदिर मिरजकर तिकटी, अंबाबाई मंदिर महाद्वार चौक, दत्त मंदिर गंगावेश ओढय़ावरचा गणपती उमा टॉकीज नजीक व रेणुका मंदिर मंगळवार पेठ या प्रमुख नऊ मंदिरांच्या समोर शनिवारी सकाळी 11 वाजता हे घंटानाद आंदोलन होणार आहे.
या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे ः कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत् करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, दारुची दुकाने ’पूनःश्च हरी ओम’ च्या नावाखाली सर्व काही सुरू केले. लहान-मोठी व्यापाऱयांची दुकाने, केश कर्तनालयये इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी लोकांची ची भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते अशी मंडई देखील सुरू झाली आहे. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ’हरी’ ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.
गेली पाच महिने मंदिरे बंद असल्यामुळे अनेक लोकांची मानसिकता बिघडली आहे. मंदिरामध्ये येणारा भाविक हा स्वतः सुचिर्भीत होऊनच म्हणजे हात पाय स्वच्छ धुऊन स्वच्छतेचे भान ठेवूनच मंदिरामध्ये प्रवेश करत असतो. मंदिरांवर अवलंबून असणाऱया अनेक लहान मोठय़ा व्यापाऱयांच्या कुटुंबीयांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा विचार सरकार करणार आहे की नाही ? संतभूमी महाराष्ट्रात मद्य विक्री मुबलक सुरू आहे आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल दाखल होत आहेत. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे.
महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही 4 जून 2020 रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांतून होते आहे. मात्र हरीलाच बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनाला भाजपचा पाठिंबा
या घंटानाद आंदोलनास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. या आंदोलनामध्ये भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोल्हापूरचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंग, फेस मास्कचा वापर करून या आंदोलनात सहभाग नोंदविणार आहेत.
सद्यःस्थितीत कोरोनामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. मंदिरे खुली करण्यास सशर्त परवानगी द्यावी, अशी भाविकांची मागणी आहे. शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारचे घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
-अशोक देसाई, संस्थापक अध्यक्ष हिंदूयुवा प्रतिष्ठान, कोल्हापूर