प्रवाशांची गैरसोय, परिवहनचे दुर्लक्ष : बसस्थानक आवारात जागोजागी डबकी, रस्त्याची दुर्दशा, शौचालयाची अस्वच्छता

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज असे बसस्थानक उभारण्यात येत आहे. याकरिता बसस्थानकाच्या आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. बसस्थानकाच्या आवारात जागोजागी पडलेली डबकी, रस्त्याची दुर्दशा, शौचालयाची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, आसन व्यवस्थेची दुर्दशा अशा अनेक समस्यांनी बसस्थानक ग्रासले आहे. सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना प्रवाशांना करावा लागत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बसस्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडून डबकी निर्माण झाल्याने बसचालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसाने या डबक्मयांतून पाणी साचून राहत असल्याने प्रवाशांना यातून वाट काढावी लागत आहे. शिवाय कसरत करतच बसमध्ये चढावे लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात पुरुष महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय आहे. मात्र या ठिकाणी अस्वच्छता पसरलेली पहायला मिळते. त्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गैरसोय होत आहे. दरम्यान, प्रवाशांना सोबत पाण्याची बाटली आणावी लागत आहे. आवारात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे पाण्याविना हाल होताना दिसत आहेत.
आसन व्यवस्थेची दुर्दशा
बसस्थानकात तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसथांब्यांची दुर्दशा झाली आहे. विशेष करून आसन व्यवस्था मोडकळीस आल्याने प्रवाशांना ऊन-पावसात ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे बस वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परिवहनने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आसन व्यवस्थेची दुरुस्ती करावी.
बसस्थानकात बसफेऱयांबरोबर प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. मात्र प्राथमिक सुविधांअभावी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. स्मार्ट बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू असल्याने बसस्थानकात पार्किंगचा प्रश्न ही गंभीर बनला आहे. परिवहनने याची दखल घेऊन बसस्थानकात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
प्रवासी संख्येबरोबर महसुलात वाढ
मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनचा दैनंदिन महसूल देखील 50 लाखांहून पुढे गेला आहे. परिवहनचे उत्पन्न वाढत असले तरी बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना मात्र अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नवरात्रोत्सव तेंडावर आल्याने विविध मार्गांवर जादा बस धावत आहेत. विविध ठिकाणांहून येणाऱया प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे बसस्थानक पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे गजबजताना दिसत आहे. मात्र प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.