ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शिवराज सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या अंतर्गत आता ज्या जिल्ह्यात 20 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील त्या जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत स्विमिंग पुल, क्लब आणि थिएटर बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, भोपाळ, इंदौर आणि जबलपूर जिल्ह्यात आधीपासूनच रविवारी लॉकडाऊन सुरू आहे. रुग्ण वाढीचे प्रमाण लक्षात घेत आता एकूण 7 जिल्ह्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे.
यामध्ये बैतुल, छिंदवाडा, रतलाम आणि खरगौर या जिल्ह्यात देखील रविवारी लॉकडाऊन असणार आहे. हे लॉकडाऊन शनिवारी रात्री 10 वाजता सुरू होऊन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. दरम्यान, होळी मीलन, सार्वजनिक कार्यक्रमावर देखील बंदी घालण्यात आली आहे.