मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसस्थानकाचा विकास

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली असून ही कामे वेळेत आणि व्यवस्थित पार पडली आहेत. महापालिकेची आयनॉक्स बिल्डिंग, कारवार बसस्थानक आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी उपक्रम उत्कृष्टरित्या राबविण्यात आले आहेत. शहरवासियांसाठी सोयीचे ठरणार असल्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रेल्वे बसस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. या बसस्थानकाचे काम पूर्ण होवून महिना उलटला आहे. पण उद्घाटन झाले नव्हते. मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच महापालिका कार्यालय आवारात प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. सदर इमारतीचे काम पूर्ण होवून वर्ष होत आले. पण उद्घाटन झाले नव्हते. इमारतीच्या उद्घाटनाला मंगळवारचा मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच नेहरुनगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, नगरविकासमंत्री बसवराज बैयाती, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके, महापालिका आयुक्त रुदेश घाळी आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटन केवळ 10 मिनिटात उरकले
महापालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी एक वर्ष प्रतीक्षा करण्यात आली. मात्र इमारतीचे उद्घाटन केवळ दहा मिनिटात उरकण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित इमारत पाहणीदेखील केली नाही. तसेच कारवार बसस्थानक कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारित येते. पण कॅन्टोन्मेंट बेर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी, मुख्यकार्यकारी अधिकारी व लोकनियुक्त सदस्य, माजी सदस्य, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांसह उद्घाटनावेळी कोणीच उपस्थित नव्हते. उद्घाटन कार्यक्रम 6.30 वा. असल्याची निमंत्रण पत्रिका सर्वांना दिली होती. त्यामुळे माजी सदस्य कार्यक्रम उरकल्यानंतर उद्घाटनस्थळी दाखल झाले.