ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नावे जाहीर; सर्व प्रभागात तुल्यबळ उमेदवार देण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुकाणू समिती गठीत केली आहे. समितीची घोषणा नुकतीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. समितीमध्ये शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, सरचिटणीस सुनील देसाई, उत्तम कोराणे, अजित राऊत, संजय कुराडे, विनायक फाळके, संदीप कवाळे, महेंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागात तुल्यबळ उमेदवार देण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. महापालिका निवडणुक पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली.
बैठीकीमध्ये मंत्री मुश्रीफ म्हणाले, इच्छुक उमेदवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती मिळत आहे. प्रत्येक प्रभागातुन उमेदवारीसाठी इच्छूक संपर्क करत आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रभागाच्या विकासासाठी सक्षम उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रभावी, सक्षम उमेदवारांची निवड करण्यासाठी सुकाणु समिती करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाची चाचपणी करा. तेथील इच्छूकांबाबत नागरिकांची मत काय आहे, हे जाणून घ्या. या सर्व बाबींचा विचार करुन शहरातील सर्व 81 प्रभागांसाठी तुल्यबळ उमेदवाराची निवड करा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी समिती सदस्यांना केले.
त्यानुसार समिती सर्व प्रभागांची चाचपणी करुन तेथील इच्छुक उमेदवारांची माहिती घेवून त्याचा अहवाल तयार करतील. हा अहवाल मंत्री मुश्रीफ यांच्याकडे सादर केला जाईल. यानंतर मंत्री मुश्रीफ जो निर्णय घेतील त्यानुसार समिती पुढील कार्यवाही करणार आहे. बैठकीला आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.