नवी दिल्ली/प्रतिनिधी
भाजपने भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत बेधडकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपनेत्या प्रियांका टिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. ३० सप्टेंबरला तेथे पोटनिवडणूक होत आहे. यासोबतच ममतांविरोधात प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांचा समावेश असलेली स्टार प्रचारकांची फळीही उतरविण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. दरम्यान, पक्षाने मिलन घोष व सुजित दास यांची नावे समशेरगंज व जांगीपूर येथे या जागांसाठी जाहीर केली आहेत. या तीनही मतदारसंघात ३ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, भाजपने ममतांचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे.
भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिब्रेवाल यांची उमेदवारी आज जाहीर झाली. पेशाने वकील असलेल्या टिब्रेवाल या केंद्रात मंत्री राहिलेल्या आहेत. तसेच राजकारणातून संन्यासाची घोषणा करणाऱ्या बाबूल सुप्रियो यांच्या त्या विधी सल्लागार होत्या. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकही त्यांनी लढविली होती. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध त्या ५८ हजारहून अधिक मतांनी पराभूत झाल्या होत्या. पण आता भाजप नंदिग्रामच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असून भाजपकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जींचा भवानीपूर हा पारंपरिक मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणाऱ्या ममता यांना ही निवडणूक अवघड नाही, असे तृणमूलचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील नंदिग्रामच्या निकालाची पुनरावृत्ती भवानीपूरमध्ये करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.