निवडणूक आयोगाचे प्रतिपादन -तृणमूल नेत्यांच्या अटकेच्या आदेशाचा दावा
पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने विधान प्रसिद्ध केले आहे. निवडणूक आयोग तृणमूलच्या गुंडांना अटक करण्याच आदेश देत असल्याचा ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता. हा दावा खोटा आणि भ्रम पसरविणारा असल्याचे आयोगाने सांगितले आहे.
आयोगाने एक लेखी विधान प्रसिद्ध करत भूमिका मांडली आहे. तृणमूलच्या गुंडांना अटक करण्याचे आदेश दिल्याचे असे ममतांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. पण तपासात हा आरोप पूर्णपणे चुकीचा आढळला असल्याचे या विधानात म्हटले गेले आहे

आमच्याकडून किंवा अन्य अधिकाऱयाकडून अशाप्रकारचा कुठलाच आदेश देण्यात आलेला नाही. प्रकरण न्यायालयात नेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे, पण तो देखील चुकीचा आहे. आमच्याकडे अद्याप यासंबंधी कुठलीच नोटीस आलेली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
ममतांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. आयोगाच्या अधिकाऱयांचे अनेक कथित व्हॉट्सअप चॅट दाखवून ममतांनी आयोग पूर्णपणे भाजपच्या इशाऱयांनुरुप काम करत असल्याचा आरोप केला होता. भाजपच्या सुचनेमुळेच बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येत आहे. याचमुळे बंगालसह देशभरात कोरोनाचा कहर वाढला असल्याचा दावा ममतांनी केला होता.