जांबोटी /वार्ताहर
कुसमळी ता. खानापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेची गुरुवारी रात्री अज्ञात समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आल्यामुळे, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कुसमळी प्राथमिक मराठी शाळा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मात्र गुरुवारी रात्री समाजकंटकांनी या शाळेच्या आवारात प्रवेश करून, शाळेच्या चार वर्गखोल्यांचे दरवाजे तोडले. तसेच खिडक्मयांची तावदाने व जाळीची देखील नासधूस करण्यात आली आहे. त्याचबरोबर वर्गातील पंखा व इतर साहित्याची मोठय़ा प्रमाणात नासधूस केली आहे. तसेच समाजकंटकांनी दोन कपाटे देखील फोडण्याचा प्रयत्न केला. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे, समाजकंटकांनी शाळेची केलेल्या नुकसानीची कुणालाही कल्पना आली नाही. मात्र शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर गावातील नागरिक व एसडीएमसी समितीने शाळेची पाहणी करून सदर घटनेची माहिती जांबोटी पोलीस आऊट पोस्टच्या हवालदाराना कळविण्यात आली. जांबोटी आउट पोस्टचे हवालदार सनदी यांनी कुसमळी प्राथमिक शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. समाजकंटकांनी शाळेमध्ये चोरीच्या उदेशाने प्रवेश केला होता की अन्य कोणत्या कारणाने याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या केलेल्या नुकसानीमुळे पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. समाजकंटक गावातील आहेत की बाहेरील याचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे..