10 पट अधिक संसर्ग फैलावण्याची क्षमता : भारतातून परतलेल्या व्यक्तीला लागण : नागरिकांना प्रशासनाचा इशारा
मलेशियात कोरोना विषाणूचे आढळून आलेले स्वरुप (स्ट्रेन) 10 पट अधिक संसर्ग फैलावणारे आहे. या नव्या स्ट्रेनला डी614जी नाव देण्यात आले आहे. हा स्ट्रेन पहिल्यांदा जुलै 2020 मध्ये आढळून आला होता. कोरोनाचा हा स्ट्रेन 45 लोकांच्या समुहातील बाधितांपैकी 3 जणांमध्ये सापडला आहे. हा विषाणू भारतातून परतलेल्या एका रेस्टॉरंटमालकाद्वारे फैलावला आहे. संबंधित बाधिताने प्रवासानंतर 14 दिवसांपर्यंत विलगीकरणाचे पालन केले नव्हते. त्याला 5 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावण्यात आला आहे. विषाणूचा हाच स्ट्रेन फिलिपाईन्समधून परतलेल्या लोकांच्या आणखी एका समुहात आढळून आला आहे.
लसनिर्मितीवर प्रभाव
कोरोनाच्या आढळून येणाऱया नव्या स्ट्रेनमुळे अनेकपरिणाम होतात. कोरोनाने स्वतःचे स्वरुप बदलल्याने त्याचा काही प्रमाणात प्रभाव लसीच्या क्षमतेवरही पडत असल्याचे मलेशियातील जनरल हेल्थचे डायरेक्टर नूर हिशाम अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
अमेरिका, युरोपात सर्वाधिक
कोरोनाच्या स्ट्रेनमध्ये सर्वाधिक बदल युरोप आणि अमेरिकेत दिसून आला आहे. परंतु येथील स्ट्रेन अधिक धोकादायक ठरणार नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सेल प्रेस जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार कोरोनाच्या अशा स्वरुपांचा लसीच्या क्षमतेवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता कमीच आहे.
संसर्गसाखळी
कोरोनाचा हा स्ट्रेन मलेशियात आढळून आल्याने लोकांनी सर्वप्रकारची खबरदारी बाळगण्याची गरज आहे. म्युटेशनमुळे वाढत चाललेली कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची गरज असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग फैलावण्यापासून रोखणे आणि त्याला तोंड देण्याप्रकरणी मलेशियात उत्तम कामगिरी पार पाडली आहे. 28 जुलैपासून आतापर्यंत (16 ऑगस्ट) देशात केवळ 26 नवे रुग्ण सापडले आहेत. नवा स्ट्रेन आढळल्यावर तेथील लोकांना इशारा देण्यात आला आहे.
निवडणूक लांबणीवर

वाढणारे रुग्ण पाहता न्यूझीलंडने सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आता 17 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी केली आहे. निवडणुकीसाठी यापूर्वी 19 सप्टेंबरचा दिवस निर्धारित करण्यात आला होता. नव्या तारखेला सुरक्षित पद्धतीने निवडणूक पार पाडता येणार आहे. तारखेत पुन्हा बदल करण्याची गरज भासणार नाही. सर्व मतदारांना पक्ष आणि उमेदवारांविषयी योग्य माहिती प्राप्त करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे आर्डर्न यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत 1.7 लाख बळी

अमेरिकेत कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 73 हजार 139 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये तेथे 483 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात फ्ल्यूचा काळ सुरू होणार असल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते असे आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे. इन्स्टीटय़ूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशननुसार आगामी महिन्यांमध्ये बळींचा आकडा 3 लाखाहून अधिक होऊ शकतो.
इटली : नाइटक्लब बंद

इटलीने सोमवारपासून 3 आठवडय़ांसाठी सर्व नाइटक्लब, डिस्को क्लब बंद करण्याची घोषणा केली आहे. काही भागांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. महामारीमुळे झालेल्या मृत्यूंकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लोकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणे आवश्यक होते, असे विधान आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरांजा यांनी केले आहे.
कर्करोगावरील औषधाची चाचणी

कोरोनावरील उपचारासाठी कर्करोगाच्या औषधाचे क्लीनिकल ट्रायल ऑस्ट्रेलियन संशोधक सुरू करणार आहेत. या औषधाच्या माध्यमातून विषाणूला नाक आणि गळय़ात जाण्यापासून रोखता येईल अशी अपेक्षा त्यांना वाटत आहे. ब्रोमॅक नावाचे हे औषध एकप्रकारे नेजल स्प्रे असून ते विषाणूला फुफ्फुसांसह शरीराच्या अन्य भागात फैलावण्यापासून रोखू शकते असे मानले जात आहे. ब्रोमॅक हे कोरोनाच्या पृष्ठभागावरील स्पाइक प्रोटीन तोडण्यास सक्षम आहे. तसेच स्पाइक प्रोटीनला पेशींशी जोडण्यापासून ब्रोमॅक रोखत असल्याचे प्राध्यापक डेव्हिड मॉरिस यांनी म्हटले आहे.
मास्कविरोधात निदर्शने

कोविड-19 महामारीपासून बचावासाठी मास्क तसेच अन्य नियम कठोरपणे लागू करण्याच्या प्रकाराला स्पेनमध्ये विरोध होत आहे. ‘स्वातंत्र्या’च्या घोषणेसह लोकांनी माद्रिदमध्ये निदर्शने केली आहेत. ध्वजासह एकत्र आलेल्या लोकांनी घोषणाबाजी केली आहे. ‘द व्हायरस डज नॉट एक्झिट’, ‘मास्क किल अँड वुई आर नॉट अप्रेड’ असे फलक झळकविले आहेत.
नव्या निर्बंधांची घोषणा

हाँगकाँगमध्ये दिवसभरात 44 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथे प्रतिदिन आढळून येणारी रुग्णसंख्या कमी होत असली तरीही सरकारने सोमवारी नवे निर्बंध लागू केले आहेत. हाँगकाँगमध्ये 25 ऑगस्टपर्यंत लोक संध्याकाळी 6 वाजल्यावर रेस्टॉरंटमध्ये खाता येणार नाही. याचबरोबर सर्व सार्वजनिकस्थळी मास्क वापरणे अनिवार्य ठरणार आहे.