ग्रामपंचायत अध्यक्षांसह सदस्यांकडून झोपडय़ा खाली करण्याच्या सूचना
वार्ताहर / उचगाव
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन संबंधित अधिकाऱयांनी सर्व ग्रामपंचायतींना केले आहे. या संदर्भात उचगाव ग्रामपंचायतीतर्फे मळेकरणी देवीच्या अमराई परिसरात असलेल्या भटक्या जमातीच्या झोपडपट्टय़ा तात्काळ हलवाव्यात यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष व सदस्यांनी भेटून त्यांना इशारा दिला आहे. येथील काही झोपडय़ा हलविण्यास प्रारंभही झाला आहे. हे सर्व भटक्या जमातीचे लोक गावच्या भोवताली बऱयाच दिवसांपासून वास्तव्य करून आहेत. याठिकाणी शुक्रवार, मंगळवारी मळेकरणी देवीची यात्रा होत असल्याने त्यांना आठवडय़ातून दोनवेळा मोफत जेवण मिळत असते. त्यामुळे ते महिना-दोन महिने या ठिकाणी वास्तव्य करून राहत असतात. या झोपडपट्टीतील सर्व लोक गावच्या आजूबाजूला शौचालय करून सर्वत्र घाण करत असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे.
सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छता
नागरिकांना दुर्गंधीमुक्त करण्यासाठी गावातील सर्व आदिवासी झोपडपट्टय़ांना तात्काळ हलविण्यासाठी त्याठिकाणी भेट देऊन चार दिवसांच्या आत त्या झोपडय़ा खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. या झोपडपट्टीतील नागरिकांमुळे रोगराई वाढत असल्याने गावांमध्ये त्याचा त्रास होत आहे. ते सर्व लोक दररोज कुठल्या ना कुठल्या कामासाठी सर्वत्र फिरत असतात व ते परत संध्याकाळी गावांमध्ये येत असतात. जे या ठिकाणी राहतात त्याठिकाणी सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे त्यांचा धोका गावातील नागरिकांना आहे. ग्रा. पं. ने त्यांच्यावर कडक कारवाई करून लवकरात लवकर या झोपडपट्टय़ा हलविण्यास सांगितले आहे.
या मोहिमेमध्ये ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, ग्रा. पं. सदस्य यादो कांबळे, बंटी पावशे, लक्ष्मण चौगुले, मोनाप्पा पाटील, गजानन नाईक, उमेश बुवा, योगिता देसाई, स्मिता खांडेकर, रुपाली गिरी, अनुसया कोलकार, बाळकृष्ण तेरसे, समरीन बंकापुरे, दत्ता बेनके, सूरज सुतार, माधुरी पाटील, रुपा गोंधळी, पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यालये बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा

मराठी-कन्नड शाळेच्या मागील गल्लीतील व पावशे आमराईतील नागरिकांनी उचगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून या भागातील कार्यालयांमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तरी येथील कार्यालये बंद करावीत व मळेकरणी यात्रेसाठी सदर कार्यालयांचा उपयोग करू नये, तातडीने ती बंद करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर भागात नागरिकांची वसती आहे. वर्षभर या कार्यालयांमधून तसेच पार्टी हॉलमधून लग्न समारंभ, देवीची यात्रा व लहान-मोठे अनेक कार्यक्रम होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या परिसरात दारू पिणे, धिंगाणा घालणे, नशेत दारूच्या बाटल्या फोडणे यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. डी. जे. च्या आवाजामुळे लहान मुलांसह वयस्कर यांची कुचंबना होत आहे. तरी याची तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर पन्नास नागरिकांनी सहय़ा करून सदर निवेदन ग्रा. पं. ला दिले आहे.