प्रतिनिधी/ खेड
पुराच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच येथील नागरिकांसमोर डेंग्यूच्या माध्यमातून नवे संकट उभे ठाकले आहे. पुरामुळे वाहून आलेला चिखल, कचरा व पाणी यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. यामुळे शहरात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले असून सद्यस्थितीत 8 डेंग्यूचे रूग्ण उपचार घेत आहेत.
22 जुलै रोजी झालेल्या तुफानी अतिवृष्टीमुळे बाजारपेठेसह अनेक घरे पुराच्या पाण्यात अडकली होती. बहुतांश दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्यांसह इतर साहित्य कुजून गेले आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर बाजारपेठेसह अनेक घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या चिखल व कचऱयामुळे डासांची उत्पत्ती झाली आहे. याचमुळे शहरात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे.
नगर प्रशासनाची तातडीने स्वच्छता मोहीम
आधीच कोरोनाचा कहर, त्यात डेंग्यूच्या साथीची भर पडल्याने नगर प्रशासनाची चिंता वाढली आहे. महापुरानंतर पसरणारी संभाव्य रोगराई टाळण्यासाठी नगर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. यासाठी शहरात आरोग्य शिबिरांचे आयोजन व जनजागृती सुरु आहे. प्राासनामार्फत पूरग्रस्त भागात किटकनाशक फवारणीही केली जात आहे. मात्र डेंग्यूचे रूग्ण आढळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.