वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील बावनदी येथे भरधाव कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात घडला. यात दोघेजण जखमी झाले असून महामार्ग वाहतूक 5 तास ठप्प झाली होती. नववर्ष साजरे करण्यासाठी कोकणाकडे आलेले पर्यटक 5 तास बावनदी येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांचे हाल झाले.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्र आहे. शनिवारी सकाळच्या दरम्यान अमोल जगदीश केसकर (मोरवे-खंडाळा) हे आपल्या ताब्यातील महिंद्रा ब्लाझो ट्रक (एमएच 46 एआर 3389) घेऊन चालले होते. त्यांच्यासोबत जनार्दन शेळके हाही ट्रक (एमएच 46 एआर 3419) घेऊन निवळी ते सातारा असे जात होते. यावेळी जनार्दन शेळके यांचा ट्रक पुढे होता. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी पुलावर ट्रक आला असता मुंबई बाजूकडून येणारा ट्रक (क्रमांक एमएच 09 बीसी 9181) हा भरधाव वेगाने येऊन पुढे असणाऱया ट्रकच्या ड्रायव्हर बाजूला जोरदार धडकला. गाडी मागील बाजूचा पुलाचा कठडा तोडून पुलाच्या बाहेरील बाजूस गेली. यावेळी मागून येणाऱया ट्रकची पुढे असणाऱया कारला धडक बसली. या धडकेमध्ये अर्शिया सोहेल मनेर (26, उद्यमनगर, रत्नागिरी) हा प्रवासी जखमी झाला. अपघाताची खबर अमोल जगदीश केसकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.

पर्यटक अडकले बावनदीत
महामार्गावर बावनदी येथे झालेल्या अपघातामुळे सलग 5 तास महामार्गाची वाहतूक खोळंबली होती. अपघाताची खबर संगमेश्वर पोलीस ठाण्यात मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, देशमुख शिंदे, चव्हाण, चालक तेरवणकर, वाहतूक पोलीस राठोड, घडशी, पप्या कदम, पोलीस नाईक शिंदे, संतोष कदम घटनास्थळी दाखल झाले होते. पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोकलेनच्या सहाय्याने पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने व वाहनचालकाच्या मदतीने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली, परंतु नववर्ष साजरे करण्यासाठी आलेले पर्यटक बावनदी येथे अडकले होते.
दोन क्रेन, एका जेसीबीच्या सहाय्याने वाहतूक सुरळीत
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्यानंतर संगमेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्यासह पोलीस सचिन कामेरकर, शिंदे, चव्हाण व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 4 वाहने बाजूला करत असताना 2 क्रेन आणि एक जेसीबी बोलावण्यात आला. त्यानंतर एक क्रेन ट्रक बाजूला करत असताना मध्येच फसली. मात्र जेसीबी व दोन क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि कार बाजूला करण्यात आले. त्यामुळे सलग 5 तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.