ऑनलाइन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील चोवीस तासात राज्यात विक्रमी वाढ झाली आहे. गुरुवारी राज्यात 4814 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना ग्रस्तांचा आकडा दीड लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. राज्यात एकूण संख्या 1 लाख 47 हजार 741 इतकी झाली. तर 3,661 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, राज्यात सध्या 63,343 रुग्ण ॲक्टिव्ह असून आतापर्यंत 77 हजार 453 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. गुरुवारी राज्यात 191 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 109 जणांचा मृत्यू गेल्या 48 तासात झाला तर उर्वरित 83 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यात मृत्यू दराचे प्रमाण 4.69 टक्के असून आतापर्यंत 6,931 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, राज्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. 29 मे रोजी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर 15 जून रोजी 5071 रुग्ण तर 24 जून ला 4161 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.42 टक्क्यांवर पोहोचले आहे.
सध्या राज्यात 5 लाख 56 हजार 428 नागरिक होम क्वारंटाइन आहेत. तर 33 हजार 952 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.