ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमध्ये बंद असलेला सलून व्यवसाय 28 जूनपासून सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता महाराष्ट्रात पुढील आठवड्यापासून सलून सुरू केली जाणार आहेत. पण सलूनमध्ये केवळ केस कापण्यासाठी परवानगी दिली आहे. दाढी करण्याची परवानगी सध्या नाही आहे. तसेच यावेळी न्हावी आणि येणारा ग्राहक या दोघांची मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुढे ते म्हणाले, ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल.