ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात रविवारी 3390 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 07 हजार 958 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दिवसभरात 1632 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 50 हजार 978 कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 53 हजार 17 रुग्ण उपचार घेत आहेत.

काल दिवसभरात 120 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 81 पुरुष आणि 39 महिला रुग्णांचा समावेश आहे. 120 मृत रुग्णांपैकी 80 जणांमध्ये मधुमेह, हृदय रोग, उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार आढळले आहेत. कोरोनामुळेे राज्यात आत्तापर्यंत 3950 जणांनी आपला जीव गमावला आहे.
तसेच सध्या राज्यात 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 92 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून आतापर्यंत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 6 लाख 57 हजार 739 नमुन्यांपैकी 1 लाख 7 हजार 958 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 87 हजार 596 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 29 हजार 661 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.