डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे रुग्णांचे तत्परतेने स्थलांतर
कोल्हापूर / प्रतिनिधी
सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमधील आयसीयू कक्षामधील विद्युत बिघाडामुळे आज पहाटे आग लागण्याची घटना घडली. डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी सतर्कता दाखवून तत्परतेने रुग्णांना दुसऱ्या आयसीयूमध्ये स्थलांतरित केले आणि आगही आटोक्यात आणली. या घटनेची महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सीपीआरचे इलेक्ट्रिकल ऑडीट त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाची एक वेगळी समितीही या घटनेची चौकशी करेल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सीपीआरमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भेट देवून घडलेल्या घटनेची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. अनिता सैबन्नावर उपस्थित होते.
पालकमंत्री . पाटील म्हणाले, आज पहाटे सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये विद्युत बिघाडामुळे आग लागण्याची घटना घडली. तात्काळ इथल्या डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी तत्परतेने इथील सर्व रुग्णांना दुसऱ्या आयसीयू मध्ये स्थलांतरित केले. आग आटोक्यात आणली. जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांनी तात्काळ भेट दिली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या माध्यमातून सीपीआरचे संपूर्ण इलेक्ट्रिकल ऑडीट करण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर एक वेगळी वैद्यकीय शिक्षणाच्या समितीच्या माध्यमातून या घटनेची चौकशी केली जाईल. सुदैवाने या आयसीयूमधील रुग्णांना तत्परतेने दुसऱ्या आयसीयूत स्थलांतर केल्यामुळे दुर्दैवाने होणारे नुकसान टळले आहे. इथून पुढे अशी कोणतीही घटना घडू नये. यासाठी ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्थलांतर केल्यानंतर जे रुग्ण अत्यवस्थ होते. एचआरसीटी स्कोअर उच्च होता. एनआयव्ही मोडवर उपचार सुरु होते. अशा एका रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू आगीमुळे झालेला नसून हा रुग्ण आधिपासूनच अत्यवस्थ होता. सीपीआरच्या कर्मचाऱ्यांमुळे तत्परतेने रुग्ण दुसऱ्या आयसीयूत स्थलांतर केल्यामुळे जी जिवीत हानी दुर्दैवाने घडली असती ती टाळण्याचे काम सीपीआरच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
Previous Articleगांजा विकताना आंध्र मधील दोघा जणांना अटक
Next Article सांगलीत तब्बल 1011 जण कोरोनामुक्त
Related Posts
Add A Comment