वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला संघातील फलंदाज व्ही.आर. वनिताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या निवृत्तीची माहिती ट्विटरवरून दिली आहे. 31 वर्षीय वनिताने 2014 ते 2016 या कालावधीत सहा वनडे आणि 16 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
2014 च्या जानेवारी महिन्यात लंकेविरूद्ध वनिताने वनडे सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये वनिताने कर्नाटक आणि बंगाल राज्यांचे प्रतिनिधीत्व केले होते. क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याला शेवटपर्यंत सहकार्य दिल्याबद्दल वनिताने भारतीय संघातील झुलन गोस्वामी आणि मिताली राज यांचे आभार मानले आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी वनिताने क्रिकेट क्षेत्रात प्रवेश केला होता. तिने वनडे क्रिकेटमध्ये सहा सामन्यात 85 तर 16 टी-20 सामन्यात 216 धावा जमविल्या. 2021-22 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामात महिलांच्या वनडे चषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात बंगालकडून खेळताना आंध्रप्रदेशविरूद्ध 61 धावा तर हैदराबाद संघाविरूद्ध 71 चेंडूत 107 धावांची खेळी केल्याने बंगाल संघाला उपांत्य फेरी गाठता आली होती.