नेदरलँड्सने महिला हॉकी इव्हेंटमध्ये चौथ्यांदा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम गाजवला. त्यांनी शुक्रवारी रात्री संपन्न झालेल्या अंतिम लढतीत अर्जेन्टिनाला 3-1 अशा फरकाने पराभूत केले.
नेदरलँड्स संघाने दुसऱया सत्रात पेनल्टी कॉर्नरवर 3 वेळा गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेतला आणि इथेच जणू या सामन्याचा निकाल निश्चित झाला. यातील एक गोल मार्गोट व्हान गेफेनने तर 2 गोल केईया व्हान मासक्केरने केले. अर्जेन्टिनातर्फे ऑगस्टिना गोर्झेलॅनीने पेनल्टी कॉर्नरवर एकमेव गोल केला. मात्र, इतका अपवाद वगळता त्यांना फारसा प्रतिकार करता आला नाही.
तसे पाहता, अर्जेन्टिनाने दुसऱया सत्रात सातत्याने आक्रमणे चढवली. मात्र, त्यांना गोलजाळय़ाचा वेध घेता आला नाही. अंतिमतः त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल, हे निश्चित झाले. आम्ही या विजयासाठी बरेच परिश्रम घेतले होते, ते आज सार्थकी लागले आहेत, असे नेदरलँड्सची कर्णधार इव्हा डे गोएदे म्हणाली.
नेदरलँड्ससाठी हॉकीमधील हे तिसरे सुवर्ण असून या दोन्ही वेळा इव्हा डे गोएदे व लिडेविजय वेल्टन यांचा प्रत्येक वेळी विजेत्या संघात समावेश राहिला. नेदरलँड्सने 2008 व 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. तीनवेळा ऑलिम्पिक हॉकीचे सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम याशिवाय, फक्त ऑस्ट्रेलियाच्या रिचेले हॉक्स हिलाच शक्य झाला आहे. 1988, 1996 व 2000 मधील ऑलिम्पिक विजयाची ती सदस्य होती.
यापूर्वी, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्स-अर्जेन्टिना यांच्यातच महिला हॉकीची फायनल झाली आणि त्यावेळी देखील नेदरलँड्सनेच बाजी मारली होती. यंदा ब्रिटनने कांस्य जिंकले असून उष्ण, प्रतिकूल वातावरणात झालेल्या प्ले-ऑफ लढतीत त्यांनी भारताला 4-3 अशा निसटत्या फरकाने मात दिली. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱया ब्रिटनने दुसऱया सत्रात भारतावर 2 गोलची आघाडी घेतली, ती निर्णायक ठरली होती. भारतीय संघाला महिला हॉकीत आजवर एकही पदक जिंकता आलेले नाही. यंदाही ती प्रतीक्षा अधुरीच राहिली आहे.