आमदार दयानंद सोपटे यांचे प्रतिपादन केरी-तेरेखोल परिसरात कडधान्य वितरण
वार्ताहर / पालये
केरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही भेदभाव न ठेवता आपल्या मांद्रे मतदारसंघातील सर्व नऊही पंचायत क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक कडधान्य, भाजीपाला पुरविण्याचे काम सरपंच, पंचायतसदस्य तसेच स्वयंसेवक यांच्या माध्यमातून प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता आपण करीत आहे. परंतु काही विरोधक यात राजकारण आणून आपला अपप्रचार तसेच आपली बदनामी करीत आहेत याला मांद्रे मतदारसंघातील नागरिकांनी बळी पडू नये. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवून मांद्रे मतदारसंघातील जनतेने आपणाला दोनवेळा निवडून दिले या मतदारसंघातील जनतेची काळजी घेण्याची ताकद आमदार या नात्याने आपल्यामध्ये आहे, असे प्रतिपादन गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी केले.
संकट दूर करण्याची जबाबदारी सर्वांची
जगावर सध्या कोरोनारूपी आलेले संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नरत आहे. हे संकट दूर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळात मांद्रे मतदारसंघातील सर्व नऊही पंचायतक्षेत्रात भाजीपाला, कडधान्य पुरविण्याच्यादृष्टीने आमदार या नात्याने आपण जातीनिशी लक्ष घातला आहे. त्या-त्या पंचायत क्षेत्रातील सरपंच, पंचायतसदस्य, स्वयंसेवकांना या कामात गुंतवले. यात कुठलीही प्रसिद्धी घेतलेली नाही. केरी पंचायत क्षेत्रात आमदार फिरकला नसल्याचा जो काही विरोधकांनी वर्तमानपत्राद्वारे आरोप केला आहे तो चुकीचा, बदनामीकारक असून त्यांनी शहानिशा करावी. आपण सध्याच्या लॉकडाऊन काळात केरी पंचायत क्षेत्रात सहावेळा फेरफटका मारून केरीवासियांची चौकशी केलेली आहे. आमदार या नात्याने आपल्यावर सर्व ग्रामस्थांचा हक्क आहे. गरज पडल्यास कधीही आपल्याला हाक मारा, असे आवाहनही आमदार सोपटे यांनी केले.
सोशल मीडियावरूनही बदनामी
सध्या कोरोनाचे संकट आपल्यावर असून परिसरात कुणीही संशयित आढळल्यास ते संबंधितांना कळविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मांद्रे गावात ज्यावेळी कोरोना संशयित सापडल्याचे वृत्त पसरले त्यावेळी आमदार या नात्याने आपण पत्रकार परिषद घेतली. यामुळे दोघा स्थानिक बेवडय़ांनी सोशल मीडियावरून आपल्यावर टीका केली. अशा या टीकेला मांद्रेवासीय बळी पडणार नाहीत. तसेच आरोप करणारेच बदनाम होत असल्याचे आमदार सोपटे पुढे म्हणाले.
केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रात गरजूंना मोफत कडधान्य वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच रत्नाकर हर्जी, पंचायतसदस्य नमिता व्रजेश केरकर, राजन फरास, सूरज तळकर, सुरेश नाईक तसेच हरमल जिल्हा पंचायत उमेदवार अनंत गडेकर, माजी सरपंच विनय पिंगुळकर, मांद्रे मतदारसंघ भाजप मंडळाध्यक्ष मधुकर परब, जनरल सेक्रेटरी नरेश नाईक, भाजप ग्राम प्रमुख रोहन केरकर, मिलिंद तळकर, बूथ उपाध्यक्ष दीपा तळकर, युवा अध्यक्ष नवीन कुबल, गंगाराम मठकर तसेच अन्य कार्यकर्ते, स्वयंसेवक, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.
ग्रामस्थांना कडधान्य उपलब्ध केल्यामुळे आमदार सोपटे यांना सरपंच रत्नाकर हर्जी यांनी धन्यवाद दिले. पंचायतसदस्य नमिता केरकर यांनीही आमदारांना धन्यवाद दिले. ही वेळ राजकारण करण्याची नसून जनतेची सेवा करण्याची आहे. या लॉकडाऊन काळात आमदार सोपटे यांनी केरीवासियांची विचारपूस केली असल्याचे त्या म्हणाल्या.
पंचायतसदस्य सुरेश नाईक यांनीही आमदार सोपटे यांना धन्यवाद दिले व या भागात भाजीपाला, तेल, सिलिंडरसारख्या वस्तू सुरळीत उपलब्ध करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. गणेश चतुर्थी काळातही आमदार सोपटे यांनी साहाय्य केल्याचे ज्येष्ठ महिला नागरिक सुशांती चंद्रकांत वस्त या म्हणाल्या.
रेशनकोटाची चौकशी केली : मिलिंद तळकर
सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळात केरीवासियांना त्रास होऊ नयेत म्हणून स्वतः आमदार दयानंद सोपटे यांनी येथील पेडणे तालुका शेतकरी सोसायटीच्या केरी शाखेत येऊन आवश्यक रेशनकोटाचा सर्व्हे केला व धान्याचा तुटवडा जाणवू नये याची दक्षता घेतली असल्याचे समाजसेवक मिलिंद तळकर म्हणाले. केरी क्षेत्रात सध्या जनतेपर्यंत साधनसामग्री पुरविण्यास सरपंच, पंचायतसदस्य, स्वयंसेवक कार्यरत असून त्यांनाही श्री. तळकर यांनी धन्यवाद दिले.