निवडणुकीदरम्यान पंजाबमध्ये पक्षाला झटका
पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला आणखीन एक झटका बसला आहे. माजी आमदार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सामील जसवीर सिंह जस्सी खंगूडा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे राजीनामा पाठविण्यात आला आहे. अत्यंत दुःखी मनाने माझा हा राजीनामा पाठवत आहे. 20 वर्षांच्या या राजकीय प्रवासात आमदार असताना अत्यंत चांगला अनुभव प्राप्त झाला आहे. मी आणि माझे 60 वर्षीय वडिल देखील पक्ष सोडत आहोत असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जसवीर सिंह जस्सी खंगूडा यांचे कुटुंब काँग्रेसमध्ये दीर्घकाळ कार्यरत आहे. जसवीर सिंह जस्सी खंगूडा यांनी 2007 साली किला रायपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळविला होता. तर 2012 च्या निवडणुकीत मुल्लांपूर मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत ते मुल्लांपूर मतदारसंघातून उमेदवारी इच्छित होते.
जस्सी खंगूडा यांना शहरातील दिग्गज व्यावसायिकांपैकी एक मानले जाते. त्यांचे लुधियाना शहरात फाइव्ह स्टार हॉटेल पार्क प्लाझा देखील आहे. जस्सी खंगूडा हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात होते.