अपहरणाप्रकरणी न्यायालयाकडून जामीन नाही
वृत्तसंस्था/ मधेपुरा
32 वर्षे जुन्या अपहरणाच्या एका प्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार पप्पू यादव यांना शनिवारी मधेपुरा येथील सत्र न्यायालयाकडून जामीन मिळू शकलेला नाही. जामीन नाकारण्यात आल्याने त्यांना अद्याप तुरुंगातच रहावे लागणार आहे. यापूर्वी देखील यादव यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला होता.
न्यायालयात व्हर्च्युअल माध्यमातून जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. सुनावणीत पप्पू यादव यांचे वकील संजीव कुमार यांनी जामिनाच्या बाजूने युक्तिवाद मांडला. यावर न्यायालयाने 1 जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. यादरम्यान कनिष्ठ न्यायालयाकडून खटल्याच्या नोंदी मागविण्याचा आदेश देण्यात आला आहे. जामीन अर्जात पप्पू यादव यांच्या प्रकृती अस्वास्थाचा मुद्दा नमूद करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी कोरोना संकट हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना 32 वर्षे जुन्या प्रकरणी अटक झाल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.