प्रतिनिधी / कोल्हापूर
माजी महापौर सई खराडे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चेला बळकटी येत आहे. गुरूवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खराडे यांच्या फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नव्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या मानेही उपस्थित होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते.
सई खराडे यांनी यापूर्वी शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.. कृषिभूषण कै. महिपतराव उर्फ पापा बेंद्रे यांच्या कन्या असणाऱया खराडे या माजी नगराध्यक्ष कै. सखारामबापू खराडे यांच्या स्नुषा आहेत. त्यांचे पती अजित खराडे हे देखील शिवाजी तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आहेत. ज्या चंद्रेश्वर प्रभागातून सई खराडे या दोनवेळा विजयी झाल्या होत्या, त्या प्रभागात आगामी निवडणुकीत आपला मुलगा शिवतेज खराडे यांना उतरविण्याची तयारी सई खराडे यांनी केली आहे. खराडे यांचेच भाचे असणारे माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी या प्रभागातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ते काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. इंद्रजित हे कै. महिपतराव बोंद्रे यांचे नातू, माजी महापौर शोभा बोंद्रे यांचे पुत्र तर सई खराडे यांचे भाचे आहेत. महापालिका निवडणुकीत बोंद्रे विरूद्ध खराडे असा सामना रंगणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. या लढÎात पक्षीय बळ मिळविण्यासाठी खराडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. गुरूवारी मंत्री मुश्रीफ यांनी खराडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेव्हा अजित खराडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सई खराडे, शिवतेज खराडे यांच्यासह खराडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ यांना काही दिवसांपूर्वी नव्या घरी भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
सई खराडे, माजी महापौर