प्रतिनिधी / बेंगळूर
निवृत्त न्यायाधीश आणि माजी राज्यपाल रामाजोईस (89 वय) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. बेंगळूरमधील राजाजीनगर येथील निवासस्थानी सकाळी 7.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सायंकाळी 4.30 वाजता चामराजपेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामाजोईस यांनी झारखंड आणि बिहार राज्यांचे राज्यपालपद भूषविले होते. तसेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही सेवा बजावली होती. शिमोगा जिल्हय़ातील अरग येथे 27 जुलै 1931 रोजी रामाजोईस यांचा जन्म झाला होता. कायदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कायदा आणि संविधानाविषयी अनेक पुस्तके लिहिली. 1975 मध्ये आणीबाणीच्या वेळेस आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांना कारावासही भोगावा लागला. भाजपतर्फे ते राज्यसभेवरही निवडून आले होते.
रामाजोईस यांच्या निधानाबद्दल मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. एक श्रेष्ठ विचारवंत आपण गमावला आहे, असे येडियुराप्पा यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, केंद्रीयमंत्री सदानंदगौडा, प्रल्हाद जोशी, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्यासह अनेक मान्यवरांनी रामाजोईस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.