ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या सुविधेचा दर्जा उत्कृष्ट असुनही याबाबत जनतेच्या मनात साशंकता आहे. या सर्व जम्बो सुविधांबाबत जनतेच्या मनात विश्वासार्हता वाढविण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच सहा कोविड सेंटर्सचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक शहराच्या आवश्यकतेनुसार आपण सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहोत. राज्यात सुरूवातीच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रयोगशाळा होत्या. आज आपल्याकडे 550 प्रयोगशाळा आहेत. मुंबई बरोबर संपूर्ण राज्यात पुरेशा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या सुविधा उभारल्या गेल्या असल्या तरी जनतेच्या मनात या सुविधांबाबत विश्वास निर्माण करावयाचा आहे. नामांकित खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णालये दत्तक घेण्याबाबत विचारणा करावी अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.