ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर चहा विकणाऱ्या चहावाल्यास कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. या चहावाल्याने कोरोनावर मात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चहावाल्याला एक एप्रिल रोजी तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला सर्दी आणि खोकला झाला होता त्यानंतर त्याची कोरोनाची टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते.
प्रकृती सुधारल्याने त्याला 19 एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि आता त्याची प्रकृती पूर्णपणे बरी आहे अशी माहिती मिळाली आहे.
या चहावाल्याने ठाकरे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आहेत. तो म्हणाला, माझ्यावर खूप चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले आणि त्यामुळेच माझा जीव वाचला आहे. त्यामुळे मी सर्व डॉक्टर्स, नर्स आणि ठाकरे कुटुंबीयांचे आभार मानतो.
या आजारावर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की, कोणीही अजिबात घाबरू नका, फक्त स्वतः ची काळजी नीट घ्या.. असे आवाहन ही त्याने यावेळी केले आहे.