ऑनलाईन टीम / पुणे :
आजपर्यंत शाळा-महाविद्यालयांमध्ये भौतिक शिक्षणावर भर दिला जात होता. मात्र, आता कोरोनानंतरच्या बदलत्या काळात 2021 पासून या शिक्षण पद्धतीत बदल होणार असून व्हर्च्युअलायझेशन आणि सॅनिटायझेशन हे प्रवाह जीवनात मोठया प्रमाणात येणार आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय- नोकऱ्या गेल्या असून यापुढे विद्यार्थ्यांचा कल आणि समाजाची गरज ओळखून शिक्षण द्यावे लागेल. त्याकरीता माध्यमिक शाळांमध्ये परदेशी भाषा शिकविणे गरजेचे आहे. जपानसारख्या देशांमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि पुढील 20 वर्षे नोकऱ्या मिळण्याची स्थिती अशीच राहिल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृतपेढी स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात आयोजित करण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष संजय सातपुते, उपाध्यक्षा विद्या पवार, मानद सचिव अंजली गोरे, खजिनदार सुभाष ससाणे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या माजी सभासदांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक मानला जातो. ज्या देशात शिक्षक व शिक्षणाला महत्त्व असते, तो देश खऱ्या अर्थाने विकसित होतो. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पद्धतीत देखील बदल करणे गरजेचे आहे. लॅपटॉप, मोबाईल सारखी साधने आणखी 10 वर्षांनी बदलतील आणि आणखी वेगळे तंत्रज्ञान येईल. त्यामुळे आपण काळानुरुप तंत्रज्ञान व साधनांचा शिक्षणात वापर करायला हवा.