तामणे – पैंगीण येथील घटना : विवाहित मुलीचा मृतदेह सापडला,बेपत्ता आईचा शोध जारी
प्रतिनिधी /काणकोण
सगळे लोक शिमगोत्सवाची मजा लुटण्यात मग्न असताना आई आणि विवाहित मुलगी घरालगतच्या एका तळय़ात बुडण्याची ह्रदयद्रावक घटना काल रविवारी 13 रोजी संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान तामणे, पैंगीण येथे घडली. विवाहित मुलीचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशामक दलाला यश आले असून रात्री 9.30 पर्यंत सदर मुलीच्या आईचा पत्ता लागला नव्हता.
सदर घटना संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज असून आईचे नाव माया पागी, तर विवाहित मुलीचे नाव अंकिता असे आहे. अंकिताचे नावेली, सासष्टी येथे लग्न करून दिले होते. तिचा नवरा लंडनला नोकरी करत आहे. मयत अंकिताचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे निवृत्त कर्मचारी असून पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते आजारी आहेत. आपल्या वडिलांची सेवा-सुश्रुषा करण्यासाठी अंकिता आपल्या मूळ घरीच होती.
काणकोण-कारवार मार्गावर तामणे येथे रस्त्याच्या बाजूला त्यांचे मूळ घर असून घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या तळय़ाच्या ठिकाणी ही घटना घडली. यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या घरात शौचालयाची सोय नसल्यामुळे कदाचित नैसर्गिक विधीसाठी माय-लेक तळय़ाजवळ गेलेली असताना प्रथम आई पाय घसरून तळय़ात पडली असावी आणि तिला वाचविण्यासाठी पाण्यात गेलेली लेकही पाण्यात बुडाली असावी, असा अंदाज वाडय़ावरील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सदर तळय़ात मयत अंकिताचे चप्पल तरंगताना काही जणांनी पाहिले आणि तळय़ात माय-लेक बुडालेली असावीत असा अंदाज बांधला.
शिमगा तात्पुरता बंद ठेवून ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
घरातील कर्ता पुरुष आजारी आणि एकाच वेळी घरातील माय-लेक पाण्यात बुडाल्याची घटना समजताच तामणेकारांचा पारंपरिक शिमगा काही काळापुरता बंद ठेवून खेळगडय़ांनी घटनास्थळी धाव घेतली. या आकस्मिक घटनेने आजारी असलेले आनंद पागी पुरते कोसळले असून त्यांचा आधारच तुटला आहे. गलितगात्र अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्यांना एक कर्ता मुलगा आहे. घटनेचे वृत्त समजताच पागी यांच्या घराजवळ वाडय़ावरील लोकांनी एकच गर्दी केली. या घटनेची खबर मिळताच काणकोणच्या अग्निशामक दलाचे पथक त्वरित घटनास्थळी धावून आले आणि सदर तळय़ातील अंकिताचा मृतदेह त्यांनी बाहेर काढला.
मात्र रविवारी रात्री 9.30 पर्यंत माया पागी हिचा पत्ता लागला नव्हता. सदर तळी विशेष खोल नसली, तरी चिखलाने भरलेली आहे. काणकोणच्या अग्निशामक दलाचे जवान स्थानिकांच्या सहकार्याने चिखलात शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेची माहिती मिळताच 108 सेवेची रुग्णवाहिका, काणकोणचे पोलीस, पिंक पोलीस फोर्स, स्थानिक पंच शैलेश पागी आणि अन्य नागरिक या ठिकाणी धावून आले. ग्रामस्थांकडून सर्व प्रकारचे मदतकार्य या ठिकाणी चालू होते.