खडेबाजार पोलिसांची कारवाई, मोबाईल, मोटार सायकल जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
ऑटोरिक्षा मिळाली नाही म्हणून पायी चालत आपल्या घरी जाणाऱया एका इसमाला दगडाने मारहाण करुन त्याच्या खिशातील मोबाईल पळविल्याच्या आरोपावरुन खडेबाजार पोलिसांनी सोमवारी तिघा जणांना अटक केली आहे. आणखी एक तरुण फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गौतम मारुती माने (वय 19, रा. कॅम्प), ओंकार आनंद कांबळे (वय 21, रा. कॅम्प), प्रवीण शंकर उप्पार (वय 24, रा. कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटांची नावे आहेत. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, शंकर शिंदे, विनोद कुंगारे, बसवराज उज्जीनकोप्प, गोपाल अंबी, अंबरीश बेळ्ळीहाळ, रमेश गणी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
31 डिसेंबरच्या मध्यरात्री बसवाण गल्ली येथील दीपक रामचंद्र नाईक (वय 47) हे रेल्वेने बेळगावला आले. ऑटोरिक्षा मिळाली नाही म्हणून पायी चालत आपल्या घरी जात होते. त्यावेळी स्टेशन रोडवर त्यांना गाठलेल्या या टोळक्मयाने दगडाने मारहाण करुन त्यांच्या खिशातील मोबाईल पळविला होता. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून पडताळणी सुरू केली. अखेर मारहाण करुन मोबाईल पळविण्यात या त्रिकुटाचा सहभाग असल्याची माहिती मिळताच या त्रिकुटाला अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून एक मोबाईल संच व गुह्यासाठी वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील आणखी एक जण फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.