परिवहनला फटका, बुकिंगला थंडाच प्रतिसाद
बेळगाव / प्रतिनिधी
दररोज एकाच मार्गावरून प्रवास करणाऱया सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक बचत व्हावी, यासाठी परिवहन मंडळातर्फे सवलतीच्या दरात मासिक पास दिला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मासिक बसपासकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याने मासिक बसपासची मागणी अद्याप घटलेलीच आहे. त्यामुळे परिवहन मंडळाच्या तोटय़ात आणखी वाढ झाली आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून गोवा, कोल्हापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, हुबळी, धारवाड, बैलहोंगल आदी ठिकाणी दररोज प्रवास करणाऱया कामगार व नोकरदार वर्गही अधिक प्रमाणात आहे. नोकरदार व कामगारवर्गाला प्रवास करणे सुलभ व्हावे, यासाठी सवलतीच्या दरात महिन्याभरासाठी बसपास उपलब्ध करून दिला जातो. सर्रास कामगार व नोकरदार या मासिक बसच्या माध्यमातून प्रवास करत असतात. मात्र सध्या कोरोनाच्या धास्तीने मासिक बसपासची मागणी थंडावली असून परिवहनला मोठा फटका बसत आहे. कोरोनामुळे परिवहन मंडळाला दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मासिक बसपासकडे व बुकिंगकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याने परिवहन मंडळाच्या तोटय़ात आणखी वाढ झाली आहे. सध्या आगारात आगाऊ बुकिंग करण्याकडे प्रवाशांची संख्या रोडावलेली पहायला मिळत आहे. शहरासाठी मर्यादित असलेल्या मासिक बसपासचा दर 700 रुपये तर मर्यादित ग्रामीण भागासाठी 1000 रुपये तर संपूर्ण ग्रामीण भागासाठी 1300 रुपयांत मासिक बसपास उपलब्ध आहे..