मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांना आवाहन
वृत्तसंस्था/ अइजोल
मिझोरममध्ये राज्याच्या मुख्य सचिव पदावरून समस्या उभी ठाकली आहे. ईशान्येतील राज्याचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भाषेच्या समस्येचा दाखला देत आदेशात दुरुस्ती आणि मुख्य सचिव बदलण्याचे आवाहन केले आहे. राज्यात मिझो भाषा न जाणणारा अधिकारी प्रभावी ठरणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर केंद्र आणि् राज्याकडून विविध आदेश काढण्यात आल्याने मुख्य सचिवांची संख्या दोन झाली आहे.
केंद्र सरकारने 28 ऑक्टोबर रोजी एजीएमयुटी कॅडरच्या 1988 च्या तुकडीच्या आयएएस अधिकाऱयाला 1 नोव्हेंबरपासून मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले होते. याचदिवशी राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या आदेशात जेसी रामथंगा यांना मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळण्यास सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री जोरमथंगा देखील अतिरिक्त सचिव रामथंगा यांना नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करू पाहत आहेत. 29 ऑक्टोबर रोजी त्यांनी यासंबंधी गृह मंत्रालयाला पत्र लिहिले होते.
माझ्या मंत्रिमंडळातील कुठलाच मंत्री हिंदी जाणत नाही, बहुतांश मिझो लोक देखील हिंदी जाणत नाहीत आणि काही लोकांना इंग्रजीचे देखील ज्ञान नाही. अशा पार्श्वभूमीसह मिझो भाषा न येणारा मुख्य सचिव कधीच प्रभावी आणि कुशल ठरणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मिझोरममध्ये आतापर्यंत केंद्र सरकारने कधीच मिझो भाषा येत नसलेल्या अधिकाऱयाला मुख्य सचिव म्हणून नेमले नव्हते. आम्ही रालोआचे विश्वासू साथीदार राहिलो आहोत अशी आठवणही त्यांनी अमित शाह यांना करून दिली आहे.