पलूस येथील घटनाः सरकारी पक्षातर्फे आरती देशपांडे यांनी काम पाहिलेः तपासात तेजा श्वानची मदत महत्वपुर्ण ठरली
प्रतिनिधी / सांगली
पलूस येथील विठ्ठल शिंदे या वॉचमन मित्राचा खून करणा-या आरोपी विजय महादेव पवार, वय-26, रा. पलूस, जि. सांगली याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्रीमती आरती देशपांडे (साटविलकर) यांनी काम पाहिले. आरोपीस जमठेप व पाच हजार रूपये दंड तसेच हा दंड न दिल्यास एक वर्षे आणखीन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत हकीकत अशी की, मयत विठ्ठल शिंदे हा पलूस येथील जहाँगीर मुजावर यांच्या भंगार दुकानात वॉचमन म्हणून काम करत होता. त्याच्या आधी या ठिकाणी आरोपी विजय पवार हाही वॉचमनचे काम करत होता. परंतू मयत व आरोपी यांच्या सततच्या भांडणामुळे मालक जहाँगीर यांनी आरोपी पवार याला कामावरून कमी केले होते. त्याचा राग आरोपीच्या मनात धुमसत होता व याच कारणावरून तो सतत मयत शिंदे याच्याशी वेगवेगळया कारणांवरून भांडण काढत होता. दिनांक 24 ऑगस्ट 2018 रोजी नेहमीप्रमाणे जहाँगीर मुजावर हे सकाळी नऊ वाजता आपल्या भंगार दुकानात गेले असता, त्यांना विठ्ठल शिंदे दुकानाबाहेर मयत अवस्थेत दिसले. त्यावेळी त्यांनी लगेच पलूस पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जागेवर येवून जागेचा पंचनामा केला.
मयताचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेनासाठी पलूस येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. तपासी अधिकारी यानी या कामातील पुढील तपास करण्यासाठी सांगली येशून श्वान पथक मागविले. त्यामध्ये तेजा डॉग याने योग्य तो मागमूस काढून मिनाक्षी थिएटर पलूस येथे जावून तेजा डॉग घुटमळला व त्याने योग्य तो माग याकामी तपासी अधिकारी यांना काढून दिला. त्यावेळी आरोपी हा मिनाक्षी थिएटरमध्ये वॉचमनचे काम करीत होता. त्यानंतर दुस-या दिवशी आरोपी हा जहाँगीर मुजावर यांना पलूस येथील चौकात भेटला. त्याने त्यांच्याकडे विठ्ठल शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यावेळी परत जहाँगीर यांनी पोलिसांना त्याबाबत कळविले व त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीकडून गुन्हयाचे वेळचे कपडे जप्त करण्यात आले. आरोपीचे कपडे व इतर मुद्देमाल हा न्यायवैज्ञानिक अहवालसाठी पुणे येथे पाठविण्यात आला. या प्रकरणांचा सखोल तपास करून तपासअधिकारी प्रशांत पाटील यांनी जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणांची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांचे न्यायालयात सुरु होती. याकामी सरकार पक्षातर्फे एकण दहा साक्षीदार तपासण्यात आले. जहांगीर मुजावर यांची साक्ष, मिनाक्षी थिएटर मालक यांची साक्ष व त्याचबरोबर तेजा डॉग याला हाताळलेले पोलीस कर्मचारी रजपूत यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. त्याचबरोबर वैदयकिय अहवाल व न्यायवैज्ञानिक अहवाल या सगळया साक्षीपुराव्याचे आधारे या आरोपीला शिक्षा सुनावली.