प्रतिनिधी/ उंब्रज
दीपावलीची पहाट वाशीच्या दोन कुटुंबांसाठी काळरात्र ठरली. आशियाई महामार्गावर उंब्रज येथील तारळी नदीच्या पुलावर मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱया मिनीबस टॅव्हल्सला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीबस पुलाच्या कठडय़ाला धडकून सुमारे 40 ते 45 फुट खोल खाली नदीपात्रात कोसळली. या अपघातात 5 जण ठार झाले असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. तसेच एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा यांचा समावेश आहे. जखमी व मृत मुळचे केरळ राज्यातील असून ते वाशी (नवी मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. दिवाळी सुट्टीनिमित्ताने गोव्याला फिरायला जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अपघातात मधुसुदन गोविंद नायर (वय 42), उषा मधुसुदन नायर (वय 40), आदित्य मधुसुदन नायर (वय 30), साजन एस. नायर (वय 35), आरव साजन नायर (वय 3, सर्वजण राहणार बी. 2 वाशी, नवी मुंबई. मुळ राहणार मल्लपुरम, केरळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच लीला मोहन (वय 35), मोहन वेलायदन (वय 59, सर्व राहणार वाशी नवी मुंबई), सिजीन शिवदासन (वय 28), दीप्ती मोहन (वय 28, दोन्ही राहणार कोपर खैरणे, नवी मुंबई), अर्चना मधुसुदन नायर (वय 15), दीपा नायर (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच चालक रिंकू गुप्ता साहू (वय 30) हा जखमी झाला आहे. जखमींवर सातारा डायग्नग्नोस्टिक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंब्रज येथील तारळी नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. मुळचे केरळ येथील एकमेकांचे नातलग असणारी दोन कुटुंबे नवी मुंबई वाशी येथे वास्तव्यास आहेत. मागील आठवडय़ात त्यांनी दिवाळी सुट्टीत गोव्याला फिरायला जाण्याचा बेत केला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री मिनी टॅव्हल्स बस (एम. एच. 01, सीआर 9565) भाडय़ाने घेऊन रात्री 9 वाजता 13 जण गोव्याकडे निघाले होते. रात्री 11 च्या दरम्यान त्यांनी खोपोली येथे अर्धा तास थांबून जेवण केले. त्यानंतर पुढील प्रवास सुरू केला. पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान मिनीबस उंब्रजजवळ आली. त्यावेळी सदरचा अपघात घडला. तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱया कठडय़ाला मिनीबस आदळली. दोन्ही पुलांच्या मधल्या मोकळय़ा भागातून सुमारे 40 ते 45 फुट खोल नदीपात्रालगतच्या झाडीत कोसळली. मिनीबसला वेग असल्याने काही कळण्यापूर्वीच साखरझोपेतच 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात प्रकरणी चालक रिंकु विश्वनाथ साहू (रा. मध्यप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताची फिर्याद सिजीन शिवदासन यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे.
घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी मदतकार्य केले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप अधीक्षक रणजित पाटील यांनी भेट दिली. दुपारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. घटनास्थळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांच्यासह पोलीस कर्मचारी, हायवे पोलीस, हायवे हेल्पलाईन, स्थानिक नागरिक यांनी मदतकार्य केले.
जखमीमुळे समजला अपघात
पहाटेच्या वेळी महामार्गावर वाहतूक कमी होती. अपघात झाला तेव्हा या परिसरात चीटपाखरु नव्हते. त्यामुळे तारळी नदीच्या पुलावरुन मिनीबस खाली कोसळली आहे. बराच वेळ कोणालाच समजले नव्हते. मात्र या अपघातात किरकोळ जखमी झालेला एकजण कसाबसा बाहेर आला. चालत उंब्रज बसस्थानकापर्यंत पोहोचला. तेथे त्याने सकाळी व्यायामाला बाहेर पडलेल्या काहींना अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी पोलीस व 108 रुग्णवाहिका यांना माहिती दिल्याने हा अपघात झाल्याचे समजले. तोपर्यत जखमी व मृत गाडीतच अडकून पडले होते. 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर ऋषीकेश कुलकर्णी तसेच उंब्रज पोलीस व रोटरीचे सदस्य, स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेवून बसच्या काचा फोडून जखमी व मृतांना बाहेर काढले.