तातडीने अहवाल देण्याचे आदेश
मिरज/ प्रतिनिधी
येथील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उदेक होऊन 80 हून अधिक विद्यार्थी बाधित झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली असून हा उद्रेक कशामुळे झाला? याचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिले आहेत. रुग्णसेवा देणाऱया सर्व घटकांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयात चार दिवसापासून मोठय़ा संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. 80 हून अधिक विद्यार्थी आतापर्यंत बाधीत आढळले आहेत. एकाचवेळी एवढय़ा संख्येने विद्यार्थी बाधीत आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. संपूर्ण राज्यात ही घटना चर्चेचा विषय बनली होती. वैद्यकीय शिक्षण घेणारे भावी डॉक्टरच एवढय़ा मोठय़ा संख्येने कोरोनाबाधीत झाल्याने त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली होती. भावी डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला का? असा सवाल उपस्थित होत होता.
मिरजेतील या घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली आहे. त्यांनी याबाबत अधिष्ठाता यांना पत्र पाठवून या घटनेमागच्या कारणाचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर व अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. या मंडळींनाच कोरोनाची लागण झाली तर वैद्यकीय सेवा कशी पुरविणार? असा प्रश्न उपस्थित करून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाची मोठय़ा प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत विचारणा केली आहे. वैद्यकीय सेवा देताना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असणारे मनुष्यबळ बाधित होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल प्राफ्त होताच यास जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाईचे संकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.