ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मिस इंडिया दिल्ली 2019 च्या मानकरी मानसी सहगल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आमदार राघव चड्डा यांनी मानसी यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. सहगल या इंजिनियर, टेडएक्स स्पीकर आणि युवा उद्योजक असून त्यांनी स्वतःचे स्टार्ट अप सुरू केले आहे.
दिल्लीची रहिवासी असलेल्या मानसी सहगल यांनी दिल्ली पब्लिक स्कूल द्वारकामधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लोमधून उच्च शिक्षण घेतले आहे.

मानसी यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर राजीव चड्डा यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी तरुणांना राजकारणात येण्याची आणि लोकांची सेवा करण्याचा आत्मविश्वास वाढवला याचा मला आनंद आहे. आम आदमी पक्षाचे कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे. आप कुटुंबामध्ये मानसीचे स्वागत आहे. पुढे ते म्हणाले, शेकडो नवीन लोकांना सामावून घेऊन आम आदमी पार्टी वेगाने वाटचाल करत आहे.
आप पक्षात सहभागी झाल्यावर मानसी सहगल म्हणाल्या की, मला अगदी लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी चांगले करायची इच्छा आहे. आरोग्य आणि शिक्षण हे कोणत्याही देशाच्या समृध्दीचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि केजरीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षात या क्षेत्रात प्रचंड बदल घडून आलेला आहे.