टी-सीरिज बॉलिवूडची लिजेंड अभिनेत्री मीनाकुमारीचा बायोपिक तयार करणार आहे. अभिनेत्रीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी क्रीति सेनॉनची निवड करण्यात आली आहे. क्रीतिने अद्याप चित्रपटासाठी कुठल्याच करारावर स्वाक्षरी केलेली नाही. चित्रिकरणासाठी तारखा देऊ शकणार की नाही यावर ती पुढील निर्णय घेणार आहे. तर टी-सीरिजने देखील मीना कुमारींचा बायोपिक तयार करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
बायोपिकच्या दिग्दर्शनासाठी काही जणांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या निर्मितीचे सध्या नियोजन सुरू आहे. सर्वकाही सुरळीत पार पडल्यास चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होऊ शकते.
तर दुसरीकडे एका ओटीटी प्लॅटफॉर्मकडून मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित एक वेबसीरिज निर्माण केली जाणार असून याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. ही सीरिज मीना कुमारी आणि कमल अमरोही यांच्या प्रेमसंबंधांवर आधारित असणार असल्याचे समजते.
क्रीति सेनॉन आता प्रभाससोबतचा चित्रपट ‘आदिपुरुष’ तसेच टायगरसोबत ‘गणपत’ चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर भेडिया आणि शहजादा या चित्रपटांमध्ये ती काम करत आहे.