ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या वांद्रेमधल्या खेरवाडी परिसरातील रविवारी रात्री उशिरा रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला असल्याची माहिती समोर येत आहे. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे. आतापर्यंत 17 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जिथे घराचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे. दुर्घटना घडली त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही बरसत होता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अपघातानंतर परिसराचे आमदार झिशान सिद्दीकी घटनास्थळी पोहचले असून त्यांनी मदतकार्यात लक्ष घातले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेले तर नाही ना याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. 17 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, पाऊस सुरु असल्याने आणखी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.