मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना रूग्णांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसींचा साठा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी कोरोना लसीकरण बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी मुंबईकरांनी आधी लस उपलब्धतेची खात्री करूनच लसीकरणासाठी जावे असे सांगितले. यासोबतच त्यांनी पालिकेकडून मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा सध्यातरी कोणताही विचार नसल्याचे देखील स्पष्ट केले.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत ७ खासगी रुग्णालये आणि ३० सरकारी रुग्णालये आणि केंद्र अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरू आहे. तसेच, लसींचा साठा टप्प्याटप्प्याने केंद्रावर दाखल होतो. त्यामुळे नागरिकांनी घेण्याला जाण्यापूर्वी चौकशी करूनच लसीकरण केंद्रांवर गेल्यास केंद्रावर जाऊन होणारी धावपळ यामुळे टाळता येईल. १ मे पासून आपण १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करणार आहोत. यासाठी सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लसीकरणाचा साठा जसा पोहोचेल, त्यानुसार टप्प्यांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने लसी दिल्या जातील. उपलब्ध लसींचा साठा देखील बोर्डवर दाखवला जाईल. त्यानुसार लोकांनाही कळू शकेल.
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, पालिकेकडून मुंबईत घरोघरी लसीकरणाचा सध्यातरी कोणताही विचार नाही. वस्तीस्तरावर लसीकरण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू असल्याचं सांगितलं. १ मेपर्यंत जर मुबलक लसींचा साठा आला, तर वस्तीत जाऊन अॅपवर नोंदणी करून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लसीकरण करता येऊ शकेल. त्यासंदर्भात आम्ही विचार करतो आहोत.
किशोरी पेडणेकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना मुंबईत लसीकरण सुरू असलेल्या केंद्रांची यादी सादर केली. यामध्ये मुंबईत मित्तल रुग्णालय, क्रिटिकेअर रुग्णालय, तुंगा रुग्णालय, लाईफलाईन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, शिवम रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय एनलॉक्स रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये आजही लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून जेजे रुग्णालय, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, एसएआयएस रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, कूपर रुग्णालय, टोपीवाला रुग्णालय, गोकुळधाम प्रसुतीगृह, मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र, सखापाटील रुग्णालय, मालवणी सरकारी रुग्णालय, चोक्सी प्रसूतीगृह, आप्पापाडा प्रसूती रुग्णालय, आंबेडकर रुग्णालय, आकुर्ली प्रसूतीगृह, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, मा रुग्णालय अशा सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण सुरू आहे, अशी माहिती त्यांच्याकडून यावेळी दिली.
Related Posts
Add A Comment