ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराला दहशतवादी टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रोनसदृश उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचे समजते आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि परिसरात ड्रोन तसेच फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी बंदी घालण्यात आली आहे.

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून याचाच फायदा घेत दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्यात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
यानुसार मुंबईत ड्रोन किंवा तत्सम गोष्टी उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच पोलिसांकडून संपूर्ण शहरात कलम 144 जारी केले असून जमावाला बंदी घातली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहा असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.