ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई शहरासह उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. हिंदमाता, सायन, दादर भागात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
कालच पुढील दोन दिवस मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. गेल्या दीड तासात वांद्रेमध्ये 63 मिमी, महालक्ष्मी 21 मिमी, राम मंदीर स्टेशन 21 मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी ट्विट करत दिली.

तर सकाळपासूनच अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर अंधेरी सब वे या भागात पाणी तुंबल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.