ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरेकर यांना सोमवारी (4 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मजूर नसतानाही दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून 1997 पासून मुंबै बँकेच्या संचालकपदी निवडून येत आहेत. दरेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मजूर संस्थेत रंगारी असल्याचे दाखवले होते. त्यांनी 20 वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. दरेकरांनी बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केली आहे. तसेच या बँकेत कोटय़वधींचा घोटाळा झाल्याचाही आरोप आहे. आता या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत.