ऑनलाईन टीम / ठाणे :
ठाण्यातील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 4 जण दगावल्याची माहिती, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या रुग्णालयात एकूण 20 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रिटीकेयर रुग्णालयात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यानंतर ही आग संपूर्ण रुग्णालयात पसरली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोळ उसळत होते. ही आग आयसीयूपर्यंत गेली होती. आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे आयसीयूमधील रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला. आग लागली तेव्हा अनेक रुग्ण रुग्णालयात होते, त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून या आगाती 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यातील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही. आतापर्यंत या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. आयसीयूमध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी काही रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
- मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
दरम्यान, या आगीच्या घटनेत मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.