ऑनलाईन टीम / मुंबई :
अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांनी गोड बातमी दिली असून त्यांना मुलगा झाला आहे.
अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती देण्यात आली आहे. नवजात बाळ आणि श्लोका अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं यावेळी सांगण्यात आले आहेेेे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी देखील स्वतः ट्विट करत ही गोड बातमी दिली आहे. मुकेश अंबानी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मला तुम्हां सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. आकाश आणि श्लोका यांना पुत्रप्राप्ती झाली आहे.
नीता आणि मुकेश अंबानी यांना पहिल्यांदाच आजी आजोबा झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंद आणि उत्साहाचेे वातावरण आहे.
आकाश अंबानी आणि श्लोका 2019मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत होते. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांनीही आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आकाश आणि श्लोका यांच्या लग्न अत्यंत थाटामाटात पार पडले होते.