पंजाब निवडणुकीपूर्वी खाण माफियांवर ईडीची कारवाई
वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. ईडीने मुख्यमंत्री चरणजीत सिहं चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंह हनी यांच्या सुमारे 10 ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
राज्यात 10-12 ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. पीएमएलए तरतुदींच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले. ईडीचे पथक मंगळवारी पहाटे हनी यांच्या होमलँड हाइट्स येथील निवासस्थानी पोहोचले. कुणालाही घरातून बाहेर पडण्याची अनुमती नव्हती. ईडीकडून विविध दस्तऐवज आणि कॉम्प्युटर तपासण्यात आले. भूपिंदर सिंह हनी हे चन्नी यांचे नातेवाईक आहेत.
पंजाबमध्ये राजकीय पक्षांनी यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्या मतदारसंघात अवैध खाणकाम चालविल्याचा आरोप केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अवैध वाळू उपसा रॅकेटबद्दल अनेकदा ट्विट केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अवैध खाणकाम रोखण्यासाठी काहीच करत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पोलिसांकडूनही तपास
स्थानिक पोलीस याप्रकरणी पूर्वीपासून तपास करत आहेत. स्थानिक पोलिसांच्या चौकशीच्या आधारावरच ईडीने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली. छाप्याची कारवाई संपताच ईडीकडून यासंबंधी वक्तव्य प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कारवाईवेळी मुख्यमंत्र्यांचे भाचे हनी हे घरीच होते.