प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील निलजी बसस्थानकाजवळ एक तरूण देशी बनावटीचे गावठी पिस्तुल विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती इचलकंरजीच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकून अमर सिद्धनाथ महाडिक (वय २२. रा, मुगळी) याला पकडले असून त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. निलजी बसस्थानकाजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि रांऊड विक्रीसाठी शुक्रवारी दुपारी एक तरूण घेवून येणार अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचत बसस्थानकाजवळ एका तरूणाची संशयास्पद हालचाली दिसल्यावर त्याला ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे ११ हजार ४०० रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. सदर ऐवज जप्त केला. याची वर्दी पोलीस नाईक रणजित पाटील यांनी गडहिंग्लज पोलीसांत दिली आहे. विनापरवाना गावठी पिस्तुल वापरल्या प्रकरणी गुन्हा नोंदवून अमर महाडिक याला अटक केली असून अधिक तपास हवालदार संभाजी कोगेकर करत आहेत.